काँग्रेस स्वतंत्र निवडणूका लढणार, राष्ट्रवादीची भूमिका काय? जयंत पाटील म्हणाले

Update: 2021-06-04 14:36 GMT

काँग्रेस स्वतंत्र लढणार, राष्ट्रवादीची भूमिका काय?येणाऱ्या काळातील निवडणूकांमध्ये फार टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता आज कुठल्याच पक्षाला आहे असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आज याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही. कारण निवडणूका लागणार आहेत. निवडणुकीच्यावेळी काय परिस्थिती असते? त्यावेळी त्याचे अवलोकन करून त्याबाबतीत बोलणं अधिक उचित ठरेल असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्ही आघाडी सरकारमध्ये आहोत. त्यामुळे आम्हाला आमचे दोन्ही मित्रपक्ष कॉंग्रेस आणि शिवसेना यांना बरोबर घेऊन सर्व ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. पण एखाद्या जिल्हयात वेगळा विषय असेल तर संबंधित दोन्ही पक्षांशी चर्चा करुन त्यात योग्य तो निर्णय करु असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात केवळ वेळेचा अभाव झाला आहे. समन्वयाचा अभाव आहे असे नाही आणि त्यातील मला अधिक माहिती नाही असे सांगतानाच वडेट्टीवार यांना अडव्हॉन्स माहिती कुणी दिली होती का? ते पाहिलं पाहिजे. पण लॉकडाऊनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय घेते.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णांची वाढती संख्या, भविष्यात येणारी आव्हाने आणि त्या - त्या जिल्हयातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण या सगळ्याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री कार्यालय घेईल असे जयंत पाटील यांनी १८ जिल्हयातील लॉकडाऊनबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर तिन्ही पक्ष एकाच भूमिकेत आहेत. कुणाचीही वेगवेगळी भूमिका नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यामध्ये दुमतही नाही अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत सर्व काम ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आले आहे. ते याबाबतीत कायदेशीर सल्ला घेणं, योग्य ती पावले टाकणे याविषयी मंत्रीमंडळातील सदस्यांशी सल्लामसलत करून अंतिमदृष्टया कार्यवाही करत असतात त्यामुळे मराठा आरक्षणावर आवश्यक व योग्य ते विधान अशोक चव्हाणच करतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मराठा समाजाने आरक्षण मिळावे म्हणून मोठं आंदोलन केले आहे. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या विरोधात निर्णय लागलेला आहे. आता त्यातून मार्ग काढण्यासाठी दिल्ली दरबारातच आणि संसदेत यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी विचार केला पाहिजे व वेळ दिला पाहिजे असे मत जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केले.

Tags:    

Similar News