नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेस आमदाराच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे आमदार संजय यादव (Congress MLA Sanjay Yadav) यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
राहत्या घरामध्ये मुलाने स्वतःवर गोळी झाडली. रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. बरगी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचे हाथी ताल कॉलनीत घर आहे. त्यांच्या घरात दुपारी अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर घरातील लोकांनी धाव घेतली तर आमदारांचा मुलगा विभु यादव हा आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.
16 वर्षीय विभू यादवच्या डोक्याला गोळी लागली होती. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. विभू यादवची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. विभुने घरात असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. मात्र, त्यात नेमकं काय लिहिलं आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालयाच्या बाहेर सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.