'शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तर पुन्हा देशभरातील अन्नदाता आंदोलन करेल' - राहुल गांधी
केंद्र सरकारने जर आता शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तर पुन्हा देशभरातील अन्नदाता आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिला आहे.;
नवी दिल्ली// केंद्र सरकारने जर आता शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तर पुन्हा देशभरातील अन्नदाता आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिला आहे. पहिल्यांदा अहंकाराला हरवले होते, आता पुन्हा तुमच्या अहंकाराला हरवू असं राहुल गांधी म्हणाले. सोबतच कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागितलेल्या माफीचा अपमान केला असल्याचे राहुल गांधी म्हणालेत.कृषीमंत्री तोमर यांनी म्हटले होते की, कृषी कायदे रद्द केल्याने आम्ही नाराज नाही. 'एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे' असं विधान कृषीमंत्री तोमर यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तर पुन्हा देशभरातील अन्नदाता आंदोलन करेल असं गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान तोमर यांच्या वक्तव्यावरून मोदी सरकार पुन्हा एकदा कृषी कायद्याबाबत वेगळा निर्णय घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 70 वर्षानंतर शेती क्षेत्रात बदल घडवणारे कायदे केले होते. पण, काही जणांना या सुधारणा योग्य वाटल्या नाहीत, अस म्हणत तोमर यांनी विरोधकांना टोला लगावला. सोबतच कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला, मात्र, कृषी अर्थव्यवस्था या प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत स्थितीत राहिल्याचे तोमर म्हणाले. नागपूरमध्ये आयोजीत कृषी शिखर संमेलनात तोमर यांनी हे वक्तव्य केले होते.