राज्यात थंडीचा कहर, पिकांवर गंभीर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कहर सुरू आहे. तर धुळ्याचे तापमान अवघे 2.8 अंश सेल्सियस इतके खाली आहे. त्यामुळे शेतीवर गंभीर परीणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.;
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कहर सुरू आहे. तर धुळ्याचे तापमान अवघे 2.8 अंश सेल्सियस इतके खाली आहे. त्यामुळे शेतीवर गंभीर परीणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
राज्यात थंडीची लाट आली असून राज्यभर शेकोट्या पेटल्या आहेत. तर धुळ्यात सर्वात कमी 2.8 अंश सेल्सियस इतकी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यात 4 अंश सेल्सियस तर नाशिकचे जिल्ह्यातील निफाड येथे तापमान साडेचार अंश सेल्सियसपर्यंत खाली आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेमुळे आरोग्यासह पिकांवर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात आलेल्या धुळीच्या वादळामुळे राज्यातील तापमानात घट झाली होती. तर मुंबईतील तापमान 13.8 अंश सेल्सियस इतके घसरले होते. पुण्यातील तापमान 12 अंश सेल्सियस, परभणीचे तापमान 7.6 अंश सेल्सियस, अहमदनगरचे तापमान 11 अंश सेल्सियस, बुलढाणा 12.4 अंश सेल्सियस इतके घसरले आहे. तर राज्यातील थंडीच्या लाटेला काही प्रमाणात धुळीचे वादळही कारणीभुत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते. यापुर्वी 2016 मध्ये मुंबईत निचांकी 14 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.
जागतिक तापमानवाढीचा वातावरणावर गंभीर परीणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अवेळी येणारा पाऊस, सतत निर्माण होत असलेली वादळे, गारपीट, अतिवृष्टी, धुके आणि थंडीची लाट हे जागतिक तापमानवाढीचे परीणाम आहेत. त्यामुळे त्याचा आरोग्यासह शेतीवर गंभीर परीणाम होत आहे.
हवामानतज्ज्ञ डॉ. बी.एन. शिंदे यांनी हवामानातील बदलाबद्दल चिंता व्यक्त केली. तर हे सर्व जागतिक तापमानवाढीचे परीणाम आहेत. तर सध्या हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडून थंड वाऱ्यांची लाट आली आहे. त्यामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. तर पुढील चार ते पाच दिवसात राज्यातील थंडीची लाट कमी व्हायला सुरूवात होईल, असे मत हवामानतज्ज्ञ प्रा. बी.एन.शिंदे यांनी केले.
राज्यात थंडीची लाट आल्याने रब्बी पिकांसह फळपिकांवर गंभीर परिणाम होणार आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसाठी अल्हाददायक थंडी आवश्यक असते. त्यामुळे अल्हाददायक थंडीचा फायदा पिकांना होतो. मात्र सध्या राज्यात आलेली थंडीची लाट ही अत्यंत कडाक्याची आहे. त्यामुळे गहू, हरभरा पिकांना तोटा होणार आहे, अशी भीती कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली.
रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा ऊन यामुळे द्राक्षबागांमध्ये सनबर्निंगचे प्रमाण वाढते, द्राक्ष घडांच्या पाकळ्यांची गळती व्हायला सुरूवात होते. तसेच बागेत घडांचे प्रमाण जास्त असेल तर थंडीमुळे घडांच्या देठाला गाठी येऊन अन्नपुरवठा थांबतो. तसेच द्राक्ष घडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून द्राक्ष उत्पादनात घट होऊन त्याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक नवनाथ सायकर यांनी दिली.
कृषीतज्ज्ञ माणिक कदम म्हणाले की, सध्या राज्यात पडलेली थंडी ही पिकांसाठी धोकादायक थंडी आहे. या थंडीमुळे द्राक्ष मण्यांची वाढ थांबून द्राक्ष मण्यांना तडे जायला सुरूवात होते. याबरोबरच रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकावर तांबोरा रोग पडतो. हरभरा पिकाची फुलगळ होते. तर ज्वारी पिकावरही या थंडीचा परीणाम होऊन ज्वारी, केळी, कांदा आणि हळद पिकावर करपा रोग आलेला आहे. तर करपा रोगामुळे उभ्या ज्वारीची ताटं करपून जातात. याबरोबरच केळी आणि हळदीची झाडे करपा रोगामुळे करपून जातात. कांद्याची रोपं करपतात. आंबेमोहोर गळतो. तर द्राक्ष, आंबे किंवा इतर फळबागांवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे द्राक्षे, आंबे, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आलेली थंडीची लाट पिकांवरचे मोठे संकट आहे. तर बीट वगळता या थंडीचा इतर कोणत्याही पिकाला फायदा होत नाही, असे मत कृषीतज्ज्ञ माणिक कदम यांनी सांगितले. तर वातावरणातील बदलामुळे ऋतूचक्र बदलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या राज्यात थंडीची लाट आली आहे. तर या थंडीच्या तडाख्याला कोणत्याही कृत्रीम उपायाने रोखता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी बदलत्या हवामानानुसार पीक पध्दतीत बदल करावा, असे आवाहन यावेळी माणिक कदम यांनी व्यक्त केले.
कडाक्याच्या थंडीमुळे काही ज्वारीची वाढ खुंटते. तसेच थंडीचा भाजीपाल्यावरही मोठा परिणाम होतो. भाजीपाल्याची वाढ खुटते. तर जानेवारी महिन्यात रात्री थंडी जास्त आणि दिवसा कडक ऊन पडल्याने कोणत्याही प्रकारचे पीक असले तरी सनबर्नमुळे करपून जाते. तर केळी, पपई या फळबागांवरही थंडीचा परीणाम दिसून येतो. त्यामुळे वाढत्या थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि पिकाची काळजी घेण्यासाठी केळी, द्राक्षे घडांना आणि पपईला पेपर अच्छादन करावे. ज्यामुळे थंडीचा थेट तडाखा फळांना बसत नाही. त्यामुळे थंडीपासून फळांचे संरक्षण करता येते. तसेच फळबागांमधील तापमान नियंत्रित करण्यासाठी बागेत ठिकठिकाणी छोटी शेकोटी पेटवावी. त्यामुळे थंडीमुळे फळबागांवर होणारा दुष्परीणाम रोखता येऊ शकतो आणि बागेची काळजी घेता येईल, असे मत शेतकरी दिलीप मोहळकर व्यक्त करतात.
जागतिक हवामान बदलाचे शेतीवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. तर त्यामुळेच वादळापासून ते अतिवृष्टीपर्यंत आणि गारपीटीपासून ते थंडीच्या लाटेपर्यंत अनेक परिणाम दिसून येतात. तर थंडीमुळे पिकांना विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यातच बुरशी, तांबेरा, करपा, टिक्का, मावा, भुरी, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे एकीकडे वातावरणात होणारे बदल आणि त्याचा शेतीवर परिणाम होऊन पडणारे रोग यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. तर कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा होत आहे. त्यामुळे लाखोंचा खर्च करून हातचे पीक जात असल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे मत कृषी अभ्यासक पद्मकुमार पाटील यांनी व्यक्त केले.