लोकशाहीमध्ये मताला किंमत आहे पण हिंमतही लागते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखसंग्रहाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. "जे काही बोलायचे होते ते दसरा मेळाव्यात बोललो आहे, माझ्याकडे शब्दांचे धन आहे. माझ्याही पेटाऱ्यात शब्द आहेत. पण काहीवेळा बोलण्यासाठी हिंमत लागते. लोकशाहीत मताला किंमत आहे, पण हिंमतही लागते, मत नाही मिळाले तरी चालेल पण हिंमत लागते," असा टोला त्यांनी लगावला.
"अनेक जण म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे हिंदुत्व घेतले आहे. पण मधला बाळासाहेबांचा काळही आहे, त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचे विचार एक आहेत पण धारा वेगवेगळ्या आहे, हे मी कालच सांगितले. आमच्या आणि दुसऱ्यांचे धारा वेगवेगळ्या आहेत. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगजाहीर आहे. हे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही, नुसती घंटा वाजवली की झाले हिंदू असे नाही" अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. नवहिंदू हा नवीन शब्द येतो आहे आणि हिंदुत्वाला हाच धोका आहे, मी म्हणेन तेच, तसे नाही पण, ते तुला कळले आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजीची एक आठवण सांगितली. "आजीला त्यांच्या मुलाने म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारी नोकरी करावी अशी इच्छा होती. पण बाळासाहेबांनी जे काही केले ते जगजाहीर आहे आणि आता त्यांचा नातू इथे उभा आहे" अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.