मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्वकांक्षी योजना बारगळण्याच्या मार्गावर, शिवभोजन थाळी केंद्रांची 6 महिन्यांपासून बील थकली

Update: 2021-05-29 17:34 GMT

रायगढ़ / धम्मशील सावंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेली शिवभोजन थाळी योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ही योजना सुरु करताना गोरगरिबांना कमी खर्चात पोट भरून जेवन मिळेल. असं जाहीर केलं होतं. त्यानुसार जेवन देण्यात देखील येत आहे. मात्र, अन्नदात्याला जर सरकारने पैसेच दिले नाही. तर या अन्नदाता लोकांना जेवन कसं देणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

कोरोनाच्या महामारीत गरिबांसाठी दोन घास मिळवून देणारी 'शिवभोजन थाळी बंद' होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. ठाकरे सरकारने या काळात हातावर पोट असलेला मजूर, कष्टकरी, श्रमजीवी वर्गातील कुणाचीही उपासमार होऊ नये. याकरिता शिवभोजन केंद्राची महत्वाकांक्षी योजना अंमलात आणली. कोरोना काळात गरिबांच्या पोटाला आधार देणाऱ्या शिवभोजन थाळीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मात्र, शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील सुधागड, रोहा, खालापूर व अन्य तालुक्यातील केंद्र चालकांना गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकटात कुटुंबातील दोन चार सदस्यांना कसे जगवावे असा प्रश्न पडतो, अशात दररोज शेकडो लोकांना जेवण पुरवावे लागते. या महामारीत व वाढत्या महागाईत शिवभोजन केंद्र कसे चालू ठेवावे?हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

दहा रुपयात पोटभर जेवण असे या शिवभोजन थाळीचे स्वरूप आहे. चपाती, भात, भाजी आणि डाळ असे पूर्ण जेवन शिवभोजन थाळीमध्ये मिळते. लॉकडाऊन काळात ही थाळी पाच रुपयात आणि नंतर पूर्णपणे मोफत देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. हाताला काम नसलेले अनेक कुटूंब थाळी मिळावी, यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

शिवभोजन थाळी केंद्र चालकांनी राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक शिवभोजन केंद्र चालकांना त्यांनी जमा केलेल्या बिलांचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. सुरुवातीला नियमित वेळेवर मिळणारा मोबदला आता मिळत नसल्याने शिवभोजन केंद्र कसे चालवावे? या विचाराने केंद्र चालक चिंतेत आहेत. तर अनेकांवर हे केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढवली असल्याचे समजते.



शिवभोजन थाळी सुरू राहण्यासाठी केंद्र चालकांना वेळेवर मोबदला मिळणे गरजेचे आहे. सुधागड तालुक्यातील बल्लाळेश्वर मंदिर परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्राचे बिल देखील मागील पाच महिन्यांपासून रखडले आहे.

शिवभोजन थाळीच्या चालक सुवर्णा मोरे यांची मुलगी अंकिता मोरे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले की, गेली दीड दोन वर्षे शिवभोजन केंद्र योजना सुरू आहे. लोकांची उपासमार होऊ नये. यासाठी शिव भोजन केंद्राचा मोठा आधार आहे. या योजनेने गोरगरिबांच्या पोटाला अन्न मिळत आहे. अशातच सुरवातीच्या काळात बिलाची रक्कम वेळेत मिळाली. मात्र, आता आठ ते नऊ महिने बिले रखडली आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. तेलाचे, डाळीचे भाव वाढले आहेत, किराणा मालाची उधारी झाली आहे. आता किराणा दुकानदार तगादा लावत आहे. शिवाय केंद्रावर ज्या महिला काम करतात त्यांना पैसे कुठून द्यावे असा प्रश्न पडतो. आम्ही लोकांची पोट भरतो. पण आमची थाली रिकामी होतेय, शासनाने लवकरात लवकर बिले द्यावीत.

पालीत राम मंदिराच्या बाजूला शिवभोजन केंद्र चालविणाऱ्या सुषमा कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले की ,माझ्या केंद्रात पाच ते सहा माणसे काम करतात. मुख्यमंत्री साहेबांनी जी शिवभोजन योजना सुरू केली त्याने गरीब गरजू लोकांना पोटाला दोन घास मिळतात. आम्ही सर्वाना वेळेत व पोटभर अन्न मिळावे यासाठी सकाळपासून झटत असतो. मात्र मागील सहा महिन्यांपासून बिलाची रक्कम मिळाली नसल्याने केंद्र चालविताना अडचणी उभ्या राहत आहेत. आम्ही शासनाकडे बिले मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करीत आहोतच. बिल लवकर मिळाली तर आम्हाला अधिक अधिक चांगली सेवा देता येईल.


पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली येथील शिवभोजन केंद्र चालविणाऱ्या अश्विनी रुईकर यांनी सांगितले की, शिवभोजन केंद्राचा गोरगरिबाला खूप फायदा होतोय, त्यांची उपासमार टळली आहे. मात्र, आमच्या बिलांना मोठा विलंब होतोय. सध्या लॉक डाऊनमध्ये तेल, सिलेंडर, रेशनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे मोठ्या अडचणी येतात.

या केंद्रावर शिवभोजन थाळी घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येतात. अडचणींवर मात करून आम्ही शिवभोजन केंद्र चालवतोय. मुख्यमंत्री आमचे आहेत. त्यांचे आदेश आहेत. आम्हाला जनसेवा केलीच पाहिजे.

पाली बाजारपेठेत असलेल्या दिघे हॉटेल चे मालक सखाराम दिघे यांनी शिवभोजन केंद्राची परिस्थिती मॅक्समहाराष्ट्र वर सांगताना म्हटले की, शिवभोजन थाळीतून गोरगरिबांच्या पोटाची भूक भागत आहे. कुणीही उपाशी राहत नाही. मात्र, वाढती महागाई यात तेलाचे भाव, सिलेंडर, कडधान्य, कांदे बटाटे यांचे वाढलेले भाव यामुळे शिवभोजन थाळीचा अत्यल्प दर परवडत नाहीय त्यात बिले वेळेत मिळत नाहीत.

आम्ही जिल्हा संघटनेने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे शिवभोजन थाळीचे दर वाढवून मिळावे अशी मागणी केलेली आहे.

या संदर्भात आम्ही पाली सुधागडचे तहसिलदार दिलीप रायन्नावार यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले सुधागड तालुक्यातील शिवभोजन केंद्राची बिले जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केलेली आहेत. केंद्र चालकांना लवकरात लवकर बिलाची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या संदर्भात आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी बोडके यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले...

शिवभोजन संस्था चालकांची बिले तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हा पुरवठा विभागाकडे येतात. जिल्ह्याचा ट्रेजरी मंजूर केल्यानंतर बँकेत चेक जमा होतो. या विभागाशी संबंधित दोन महिने स्टाफ पॉजीटिव्ह होता. काही कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यूही झाला. तरीही आम्ही अविरतपणे काम करीत आहोत.

संस्था चालकांनी आपली बिले वेळेत जमा केली नाहीत अथवा जमा केलेल्या बिलांमध्ये काही त्रुटी असतील तर विलंब होतो. ज्या शिवभोजन केंद्र चालकांच्या बिलांना विलंब होतोय, त्यांनी तहसील अथवा जिल्हा पुरवठा विभागात येऊन चौकशी करावी. शिवभोजन केंद्रांना लवकरात लवकर बिलाची रक्कम देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.

रायगढ़ / धम्मशील सावंत

Tags:    

Similar News