दलित कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही – Adv ताजने
खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या 18 दलित कुटुंबियांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.असं म्हणत बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांनी घणाघात केला;
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या संकटात सापडलेल्या चिपळूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण लवाजम्यासह भेट दिली. पंरतु, चिपळूनपासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात असलेल्या पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या 18 दलित कुटुंबियांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मुख्यमंत्र्यांची जातीवादी मानसिकता यावरून दिसून येते, असा घणाघात बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष Adv संदीप ताजने यांनी शुक्रवारी केला.
पोझरे बौद्धवाडीला ताजने यांनी भेट देवून मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना पक्षाकडून आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या दलितांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागा देखील दिली नाही, असा गंभीर आरोप अँड.ताजने यांनी केला.
देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाली आहेत. हे वर्ष आपण स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव म्हणून साजरे करणार आहोत. असे असतांना देखील दलितांना अंत्यविधीसाठी जागा दिली जात नसेल, तर महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणायचे? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. स्थानिक आमदारांकडून दलितांना अंत्यविधीसाठी जागा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पंरतु, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची जागा अंत्यविधीसाठी देण्यात आली नव्हती, असे यावेळी ताजने यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी संवेदनशीलता दाखवून पीडित कुटुंबियांना न्याय द्यावा, मृत कुटुंबाला आर्थिक मदत करीत सरकारी नोकरीत समाविष्ठ करावे आणि त्याच गावात सर्वांचे पुर्नवसन करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
या दौऱ्यादरम्यान बसपाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव राजेंद्र अहिरे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रविण मर्चंडे यांच्यासह जिल्ह्याचे पदाधिकारी आणि गावातील लोक उपस्थित होते.