जम्मू- काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक; चार अतिरेक्यांना कंठस्नान
जम्मू : जम्मू- काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात काल झालेल्या सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आलं, तर या चकमकीत एक जवान शहीद व दोन जवान जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील कारागिराची हत्या केलेल्या अतिरेक्याचा या 4 जणांमध्ये समावेश आहे. दरम्यान, याबाबत बोलताना पोलीस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार म्हणाले की, 'कारागिर सगीर अन्सारी याची 16 ऑक्टोबर रोजी हत्या केलेला अतिरेकी अदिल वाणी असून, तो द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) जिल्हा कमांडर होता.' शोपियान जिल्ह्यात द्रगाड भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेत असताना अतिरेक्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. त्यात लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफचे 4 जण ठार झाले, तर सुरक्षा दलाचे 3 कर्मचारी जखमी झाले. अदिल वाणी हा जुलै 2020 पासून सक्रिय होता. मागच्या 2 आठवड्यात 15 अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे, मारले गेलेले सर्व अतिरेकी हे नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी होते, असे विजय कुमार म्हणाले.
दरम्यान दुसऱ्या अतिरेक्याची ओळख अजून पटलेली नसून आदिल वाणी याने लिट्टर, पुलवामामध्ये एका गरीब मजूराची हत्या केली होती. नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या इतर अतिरेक्यांची ओळख पटली असून त्यांचा देखील शोध घेतला जात आहे.