वेठबिगारीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मुलीचा वेठबिगारीमुळे मृ्त्यू झाल्याचे धक्कादायक बातमी समोर आली. त्यानंतर वेठबिगारीच्या अनेक घटना समोर आले. मात्र आता या वेठबिगारीच्या प्रकाराविरोधात राज ठाकरे आक्रमक झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्ह्यातील 11 वर्षीय गौरी नावाच्या मुलीचा वेठबिगारीतून मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्येही वेठबिगारीचे प्रकार होत असल्याचे समोर आले. त्यावरून राज ठाकरे यांनी प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, गरज पडलीच मनसेच्या पध्दतीने धडा शिकवण्याचे आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जात आहे, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे. त्यामुळे प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.
राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवे आहेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं, असंही राज ठाकरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
तसेच राज ठाकरे यांनी लोकांना आवाहन केले आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. वेठबिगारीचे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा. ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतील. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील, असा थेट इशाराच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.
तसेच यापुढे ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छाही व्यक्त केली आहे.