शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखा शिवचिंतनात रमलेला शिवआराधक शोधून सापडणार नाही- मुख्यमंत्री
मुंबई // शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज निधन झाले आहे. आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. जगाच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे.असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला मुलूख पालथा घालण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले