Santosh Deshamukh प्रकरणाची पाळेमुळे खोदणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत ग्वाही
संतोष देशमुख खुनाच्या आरोपींवर 'मोक्का'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावर सविस्तर निवेदन केले. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सर्वच पाळेमुळे खोदणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडच्या मस्साजोगमध्ये एक गंभीर घटना घडली. संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली, इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील. बीड जिल्ह्यात निर्माण झालेली Lawlessness परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल.
आवाडा एनर्जी कंपनीने एक मोठी गुंतवणूक हरित ऊर्जा प्रकल्पात बीड जिल्ह्यात केली आहे. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. यामुळे काही लोक ही कामे आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि देणार नसाल तर आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकेत वावरत आहेत. साधारणतः 6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान मस्साजोग येथे आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आदी आरोपी चालून गेले. प्रथम त्यांनी तेथील वॉचमन अमरदिप सोनवणे याला मारहाण केली. त्यानंतर तेथील सीनिअर मॅनेजर शिवाजीराव थोपटे यांना शिवीगाळ मारहाण केली. त्यानंतर वॉचमनने स्थानिक सरपंच संतोष देशमुख यांना माहिती दिली.
त्यानंतर संतोष देशमुख घटनास्थळी गेले. आपल्या गावच्या माणसांना दुसऱ्या गावची माणसे मारहाण करत असल्याचे पाहून त्यांनी आरोपींना हुसकावून लावले. यावेळी त्यांच्यात थोडीफार मारहाणही झाली. या घटनेनंतर 2 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. हा संपूर्ण घटनाक्रम तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहे, असे फडणवीस म्हणाले.
बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे तर यामध्ये जे दोष आहेत त्यांच्यावर मोक्का देखील लावणार आहेत त्याचबरोबर हे प्रकरण व्यवस्थित हाताळणारे केज पोलीस स्टेशनचे पीआय प्रशांत महाजन यांच्यावर कसलीही कार्यवाही होणार नाही असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्यामुळे आता या सर्व प्रकरणाची काही दिवसातच पाळेमुळे उकडून काढले जाणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.