पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका : उदयनराजे भोसले

पूर बाधितांना आधार देण्यासाठी खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसंच या पोस्टमधून त्यांनी प्रशासनाला इशारा देखील दिला आहे.;

Update: 2021-07-25 05:17 GMT

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला आहे. राज्यातील अनेक भागात पुरामुळे अक्षरश: हाहाकार उडाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यभरात 70 हून अधिक नागरिकांना या पूरपरिस्थितीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलंय तर अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या आहेत.

या पुराच्या तडाख्यात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले असल्याने अशा पूर बाधितांना आधार देण्यासाठी खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसंच या पोस्टमधून प्रशासनाला इशारा देखील दिला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजे भोसले काय म्हणाले?

"महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत.

वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरून काढता येईल परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदत कार्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच मदत कार्य वेगाने व प्रामाणिकपणे सुरु करावे, मदत कार्य करताना जनतेला कमीतकमी त्रास होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अन्यथा पुरग्रस्त जनतेचे श्राप-अश्राप भोगावे लागतील. असं उदयनराजे यांनी म्हटले आहे.



Full Viewदरम्यान या पोस्टमध्ये उदयनराजे म्हणालेत की, पूर येण्याची जर मानवनिर्मित कारणे असतील तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, तत्पूर्वी मदतकार्य वेगाने करावे अन्यथा जनतेचे श्राप-अश्राप सहन होणार नाहीत. असा इशारा देखील त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Tags:    

Similar News