धक्कादायक ! भाजपच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड

गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता भाजपचे सरकार असलेल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.;

Update: 2023-08-14 15:49 GMT

भाजपचे सरकार असलेल्या गोवा राज्यातील म्हापशातील करासवाडा-अकोई येथे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी घटना घडली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना घडली.

फादर बोलमॅक्स यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यातील भाजप सरकार आणि पोलिस प्रशासनावर जहरी टीका केली.

यावेळी आमदार विजय सरदेसाई म्हणाले, गोव्यातील भाजपचे सरकार कुणाचेही संरक्षण करण्यास समर्थ नाही. गोवा हे फक्त गोमंतकीयांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान विरांचे आहे. मात्र हे सरकार गोमंतकीय असो वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राष्ट्रीय वीर यांचे संरक्षण करण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. या भ्याड हल्ल्याचा आणि पोलिस प्रशासनाचा मी निषेध करतो, असं विजय सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

मी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. तसेच गोमंतकीयांनी शांतता राखावी, असं मी आवाहन करतो, असं विजय सरदेसाई यांनी ट्वीट करून म्हटले आहे.

यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे. ही घटना पुर्वनियोजित असून गोव्याची शांतता भंग करण्याचा हा डाव आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

या घटनेनंतर गोव्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. आम्ही पुतळा बसवत असताना आम्हाला काही लोकांनी विरोध केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर या प्रकरणी आता पोलिस तपास करत आहेत. मात्र दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Tags:    

Similar News