अनिल देशमुख यांच्या कार्यालयावर सीबीआयचे छापे

Update: 2021-04-24 05:14 GMT

महाराष्ट्राचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने गुन्हा दाखल केला असून देशमुख यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले जात आहे. 

माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी खंडणी वसूल करण्याचा आरोप लावला आहे. या आरोपानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटक आढळली होती. या प्रकरणात
 निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतील बारमधून १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या संदर्भात सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते.

त्यानंतर परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करुन १० दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर सीबीआयने चौकशी सुरु केली असून आज अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरी छापे टाकल्याचं वृत्त आहे.

Tags:    

Similar News