'मीच अडचणीत आहे तर परब यांच्या अडचणीबद्दल काय बोलू'- आमदार प्रताप सरनाईक
कोरोनाची परिस्थिती बघता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुचनेवरून यावर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी साजरे होणारे सर्व उत्सव रद्द करण्यात आले आहेत.अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाचा उपयोग कोरोनाच्या संकटकाळात आणि भविष्यातही ओवळा-माजिवडा मतदारसंघातील ठाणे आणि मीरा-भायंदर महापालिका हद्दीतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी करण्यात येणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून २४ तास कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकिय उपकरणांसहित कार्डियाक अँब्युलन्स, रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून ब्लड डोनेशन व्हॅन, कर्करोगाचे निदान जागेवर तात्काळ उपलब्ध होण्याकरीता कर्करोग निदान व्हॅन आणि शितपेटीसह वातानुकूलित यंत्रणा असलेला मोक्षरथ तसेच मोफत ऑक्सिजन सिलेंडर या सुविधांचे लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान यावेळी प्रताप सरनाईक यांनी दहीहंडी साजरी न करता रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा करणार असल्याचे सांगितले. तर राणेंविरोधात बोलायला मी कोणी मोठा नेता नसून एक कार्यकर्ता आहे असे बोलून त्यांनी टीका करणे टाळले. आणि अनिल परब यांच्याबद्दल विचारले असता, मीच अडचणीत असून त्यांच्या अडचणी बद्दल काय बोलू असे मिश्किलपणे त्यांनी म्हटले.