Bulldozer : प्रयागराजमध्ये आफरिनच्या घरावर बुलडोजर, सोशल मीडियावर संताप

गेल्या काही दिवसांपासून देशात बुलडोजर राजकारणाची चर्चा आहे. त्यातच उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांनी वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्या आफरिन फातीमा यांच्या घरावर रविवारी दुपारी बुलडोजर चालवण्यात आला. त्यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.;

Update: 2022-06-13 05:06 GMT

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी 10 जून रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. तर यावळी निदर्शनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे या हिंसाचार प्रकरणी 60 जणांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. तर प्रयागराजमध्ये आफरीन फातीमा यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. त्यामुळे याविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

जावेद मोहम्मद हे वेलफेअर ऑफ इंडियाचे नेते आणि सीएए विरोधातील आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. तर या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी जावेद मोहम्मद यांच्यासह 10 जणांवर मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप केला आहे. तर 10 जून रोजी त्यांनी आंदोलनाची हाक दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात जावेद मोहम्मद यांना ताब्यात घेण्यात आले.

जावेद मोहम्मद यांना 11 जून रोजी घर सोडण्यास सांगण्यात आले. तर 12 जून रोजी या घरावर बुलडोजर चालवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस अधिकारी काय म्हणाले?

जावेद मोहम्मद हा 10 जून रोजी झालेल्या हिंसाचारात सहभागी होता. तर त्यांच्या घरावर कारवाई केल्यानंतर घरातून शस्रास्रे आणि काही पोस्टर्स ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिकारी अजय कुमार यांनी दिली.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

प्रयागराजचे जिल्हाधिकारी संजय खत्री यांनी सांगितले की, जावेद यांचे घर नियमानुसार नाही. त्यामुळे त्यांच्या घरावर निष्काशन कारवाई करण्यात आली आहे. तसेच ज्यांची घरं पीडीए मानकानुसार नसतील त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नेटकरी नेमकं काय म्हणाले?

उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये आफरीन फातीमा या जेएनयूतील विद्यार्थीनीच्या घरावर बुलडोजर चालवल्याच्या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री मायावती यांनी प्रतिक्रीया दिली. त्यामध्ये मायावती म्हणाल्या की, योगी सरकारकडून विशिष्ट समाजाला टार्गेट करणे, त्यांच्या घरावर बुलडोजर चालवणे, द्वेषपुर्ण आक्रमक कृत्ये करून विध्वंस घडवून आणणे आणि विरोधातील आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विशिष्ट समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच अशा प्रकारे चुकीच्या आणि अन्यायपुर्ण भावनेने एखाद्याचे घर उध्वस्त करून कुटूंबाला टार्गेट करण्याच्या या प्रकाराची न्यायालयाने दखल घ्यावी.

ज्याप्रकारे समस्येचे मुळ कारण नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल आहे. ज्यांच्यामुळे देशात हिंसाचार घडला, देशाच्या सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र त्यांच्याविरोधात कारवाई न करता न्यायालयाच्या राज्याचा उपहास नेमका का? कारण दोन्ही आरोपी अजूनही मोकाट आहेत. हा घोर पक्षपात आणि दुर्भाग्य आहे. त्यामुळे या आरोपींना तातडीने अटक करायला हवी.

सरकारकडून नियम धाब्यावर बसवून केल्या जाणाऱ्या बुलडोजरच्या विध्वंसक कारवाईमुळे ना केवळ निरापराध परिवार उध्वस्त होत नाहीत. तर निर्दोष लोकांची घरंसुध्दा पाडली जात आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बनवलेले घरसुध्दा पाडण्यात आल्य़ाची चर्चा आहे. तर मग सरकारकडून अशा प्रकारचे कृत्य का केले जात आहे? असा सवाल माय़ावती यांनी विचारला आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनीही फेसबुक पोस्ट करून आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवणं कुठल्या कायद्यात बसतं? न्यायालयं झोपली आहेत काय? असा सवाल केला आहे.


 



तसेच एकीकडे पंतप्रधान मोदी हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना घरं देत आहेत. तर दुसरीकडे त्यांचीच घरं पाडण्याचे काम सुरू असल्याचे सत्येंद्र नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले आहे.

Tags:    

Similar News