घरकुल यादीची चौकशीसाठी बाप-लेकांचे उपोषण
बुलढाणा जिल्ह्यातील घरकुल यादीची चौकशी करण्यासाठी शेगाव तालुक्यातील माटरगाव खुर्द येथील गोविंद वाघ आणि शिवशंकर वाघ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार असल्याचा आरोप या बाप-लेकांनी केला आहे.;
सरपंच, (Sarpanch) ग्रामसेवक ( Village Sevak ) व गटविकास अधिकारी ( Group Development Officer) यांनी संगनमत करून घरकुल यादीत घोळ केला आहे. त्यामुळे या यादीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शेगाव तालुक्यातील माटरगाव खुर्द येथील गोविंद वाघ व शिवशंकर वाघ या बापलेकांनी ३ मार्च पासून बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास (Fasting ) सुरूवात केलेली आहे. माटरगाव येथील रहिवासी गोविंदा वाघ हे दारिद्रय रेषेखालील (Poverty Line) असून त्यांच्याकडे स्वतःचे घर किंवा शेती नाही. त्यामुळे त्यांनी हक्काच्या घरकुलांसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यावेळी घरकुल यादीमध्ये त्यांचे नाव सातव्या क्रमांकावर होते. परंतु सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांनी संगनमत करून लाभार्थ्यांचे नाव सातव्या क्रमांकावरून ५९ व्या क्रमांकावर टाकले.
या प्रकरणी गोविंद वाघ यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्ज दाखल केला. परंतु त्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे घरकुल यादीत घोळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गोविंद सूर्यभान वाघ व शिवशंकर गोविंद वाघ यांनी आज ३ मार्च पासून उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाने यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना आपल्या हक्काच्या घरासाठी अजून कितीवेळा संघर्ष करावा लागणार आहे. असा प्रश्न या उपोषणाकडे पाहून उपस्थित होत आहे.