बुलडाणा अर्बन बँक दरोड्यातील आरोपींना अटक ; साडे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Update: 2021-10-30 14:55 GMT

जालना : दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या शाखेतून तीन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने पळवले होते. 3 आरोपींनी हा दरोडा टाकला होता. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने दरोडा पडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरले होते.

या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दरोड्यातील 3 पैकी दोन आरोपींना पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आलं आहे. गेवराई पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून जालन्यातील गोंदी पोलिसांकडे या आरोपींना पुढील तपासासाठी हस्तांतरीत केलं आहे. दरोड्यातील रकमेच्या वाटाघाटीवरून दरोडेखोरांमध्येच आपापसात वाद झाल्याने हे दोन आरोपी गेवराई पोलीसांच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे.आरोपींनी चोरीची लाखो रुपयांची रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या बंदुकी एका गोणीत ठेऊन ही गोणी लाकडांच्या गंजीत दडवून ठेवल्याचं देखील गेवराई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे.

या आरोपींच्या ताब्यातून गेवराई पोलिसांनी 9 लाख 50 हजार रूपयांची रक्कम, 3 कोटी 42 लाख 17 हजार 711 रुपयांचे कर्जदारांचे बँकेत तारण ठेवलेले सोने असा एकूण 3 कोटी 51 लाख 67 हजार 711 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून हा मुद्देमाल गोंदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. गेवराई पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत असून पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:    

Similar News