कोरोना काळात स्थलातंरासाठी तारणहार बनलेला बॉलिवुड अभिनेता सोनू सूदला अवैध बांधकाम प्रकरणी आणखी एक झटका बसला आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात सोनू सूदने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करुनही महापालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं सोनू सूदची याचिका फेटाळून लावली आहे.
बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं, "सोनू सूद यांनी स्वत: मालकीच्या जमिनीच्या वापरामध्ये बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही."
अभिनेता सोनू सूदनं रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरित केल्याचा दावा मुंबई महापालिकेने केल्यानंतर हे प्रकरण मुंबईतील सत्र न्यायालयात गेले होते. सत्र न्यायालयानं सोनू सूदची याचिका फेटाळली होती. इतकंच नाही तर बीएमसीने सोनू सूदवर नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. सिविक अथॉरिटीने सांगितलं, नोटीस दिल्यावरही ते अनधिकृत निर्माण करत राहिले. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे.
अलिकडेच मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. झालेल्या सुनावणीमध्ये महानगरपालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे.
सोनू सूदने शक्तीसागर या सहा मजली इमारतीत अवैध बांधकाम केल्याचं म्हणत मुंबई महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली होती. सोनू सूदने जुहू येथील रहिवासी इमारतीत महापालिकेला कुठलीही माहिती न देता त्याने संरचनात्मक बदल केले असल्याचा आरोप या नोटीसीत करण्यात आला होता. महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोनूने अॅड. डी. पी. सिंह यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज त्यावर सुनावणी करण्यात आली.
मुंबई महापालिकेने यासंदर्भात जुहू पोलिसांमध्ये ४ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, सोनूने शक्तीसागर या रहिवासी इमारतीचं विनापरवानगी हॉटेलमध्ये रुपांतरीत केलं आहे. लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने याच इमारतीत स्थलांतरितांसाठी राहण्याची व्यवस्था केली होती. अभिनेता सोनू सूदने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. सोनू सूदने शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी भेट घेतली होती. अवैध बांधकाम प्रकरणामुळेच तर सोनू सूदने शरद पवार यांची भेट घेतली नाही ना अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर सदिच्छा भेट असल्याचं होतं. सोनुनं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची यापूर्वी भेट घेतली होती.