आमिर खान करोना पॉझिटिव्ह; आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काय?
ऱाज्यात दुसऱ्या कोरोना लाटेचा संसर्ग वाढत असताना बॉलिवुडचा अभिनेता आमिर खानला देखील कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो क्वारंटाइन झाला असून आमिर खानने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानं मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर सहकारी चिंतेत आहेत.;
दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासात करोनाचा शिरकाव झाला असून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सध्या उपचार घेत असून, असं असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमिर खानलाही करोना झाल्याचं अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. pic.twitter.com/DAcKifBItV
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 22, 2021
आमिर खानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. "आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी," असं आमिरच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झाला होता. हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. यावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव आदी उपस्थित होते. त्यामुळे आता आमिरच्या संपर्कात आलेल्या सर्वांबरोबरच मुख्यमंत्र्यांनाही करोना चाचणी करावी लागणार आहे.