ऊर्जा मंत्र्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी दाखवले काळे झेंडे...

रब्बी हंगामात वीज वितरण कंपनीने निर्दयीपणे वीज कापून शेतातील पिकांना ऐनवेळी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, त्या निषेधार्थ चिखली तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उंद्री गावात काळे झेंडे दाखवून विज वितरण कंपनीच्या निर्दयीपणाचा निषेध केलाय...;

Update: 2022-03-01 04:32 GMT

ऐन रब्बी हंगाम सुरू असताना वीज वितरण कंपनीने निर्दयीपणे कृषीपंपांची वीज कापण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या शासनाच्या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक झाले आहे. तर या वीज कनेक्शन तोडणीविरोधात चिखली तालुक्यात भाजपने आक्रमक आंदोलन केले आहे. तर उर्जामंत्री नितीन राऊत यांना उंद्री गावात काळे झेंडे दाखवून वीज वितरण कंपनीच्या निर्दयीपणाचा निषेध केला आहे.

रब्बी हंगामाचे पीक तोंडाशी आले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आलेले पीक हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर 28 फेब्रुवारी रोजी उर्जा मंत्री नितीन राऊत हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान उंद्री येथे नितीन राऊत यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचा भुमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

यावर्षी रब्बी हंगामात विज वितरण कंपनीने कृषिपंपाची थकबाकी वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला होता... ऐन पिकांना पाणी देण्याची वेळ असतांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नियमबाह्यपणे पठाणी , सुलतानी व तालिबानी वसुली केली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होती... शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी यासाठी भाजपा कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी यावेळी ऊर्जामंत्री गो बॅक च्या घोषणा देत त्यांना काळे झेंडे दाखवले...यावेळी भाजपा जिल्हा सचिव संजय महाले, पंचायत समिती सदस्य जितेंद्र कलंत्री, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे, यांच्या सह इतर पदाधिकारी , कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते...

उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, राज्यात कोळशाचा तुटवडा असल्याने राज्यावर वीजसंकट कोसळण्याची शक्यता आहे. तर थकबाकी वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले. मात्र ऐन रब्बी हंगामात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्याची गरज असल्याचे मत भाजपने व्यक्त केले आहे.


Tags:    

Similar News