भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे.;

Update: 2023-01-03 05:52 GMT

भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman jagtap Passes Away) हे प्रदीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच मंगळवारी सकाळी लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरासह चिंचवड (Pimpari Chinchvwad) मतदारसंघात शोककळा पसरली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असताना अमेरिकेहून इंजेक्शन मागविले होते. त्या इंजेक्शनमुळे लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्या होत्या. त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप हे खुर्चीत बसू आणि काही पाऊले चालू शकत होते. या इंजेक्शननंतर लक्ष्मण जगताप हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीसाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र मंगळवारी आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

राजकीय कारकीर्द-

आमदार लक्ष्मण जगताप यांनी 1992 मध्ये काँग्रेस (Congress) कडून महापालिका निवडणूक लढवली. त्यानंतर 1993-94 च्या काळात लक्ष्मण जगताप हे स्थायी समितीचे सभापती होते. पुढे 1998 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Laxman Jagtap) प्रवेश केला. त्यातच 2000 मध्ये लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर बनले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था या गटातून लक्ष्मण जगताप यांनी पक्षाकडे विधानपरिषदेची उमेदवारी मागितली. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत लोकसभा निवडणूक लढवली. मात्र यामध्ये लक्ष्मण जगताप यांचा पराभव झाला. यानंतर लक्ष्मण जगताप यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवून विजय मिळवला.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी आमदार लक्ष्मण जगताप यांनीही अखेरचा श्वास घेतला. 

Tags:    

Similar News