देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या सत्तापिपासू भाजपला जनतेने धडा शिकवला: नाना पटोले

एका महिलेला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील भाजपचे नेते आणि केंद्र सरकारच्या सर्व संस्था देशातील जनतेला वा-यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. सत्ता, पैसा, केंद्रीय संस्थांचा प्रचंड गैरवापर करूनही बंगालच्या जनतेने भाजपला पराभूत करून बंगाली समाज आणि संस्कृतीवर आक्रमण करू पाहणा-या हुकुमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूतील भाजपच्या पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला कोरोना संकट हाताळण्यात आलेल्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Update: 2021-05-02 13:26 GMT

पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात बेड्स, ऑक्सिजन, औषधे, रेमडेसिवर इंजेक्शन याच्या तुटवड्यामुळे देशात दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीतही देशाचे पंतप्रधान मरणा-या लोकांना वाचविण्याऐवजी पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हरवून सत्ता मिळविण्यासाठी प्रचार करत होते. देशाच्या इतिहासात असे चित्र कधी दिसले नव्हते. या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असंवेदनशील, क्रूर आणि भेसूर चेहरा देशासोबतच जगाने पाहिला. जगभरातील माध्यमांनी त्यांच्या या असंवेदनशील आणि बेफिकीरपणाची चिरफाड केली. आजच्या निकालातून पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या जनतेने निवडणुका जिंकून सत्ता मिळवण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीने धार्मिक तणाव निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न या निवडणुकीतही केला. केंद्र सरकारच्या अख्त्यारितील विविध संस्थांचा सायासाठी पुरेपूर गैरवापर केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सत्तेसाठी कोट्यवधी लोकांचे आरोग्य धोक्याच टाकणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या सूज्ञ जनतेने दिलेला कौल आपल्या बेजबाबदार केंद्र सरकारला व आपली स्वायत्ता गहाण ठेवून केंद्रातील सत्ताधा-यांना शरण गेलेल्या सर्वांसाठी धडा आहे.

या निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी फारसे उत्साहवर्धक नाहीत. पण आमच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी निवडणुकीतील विजयापेक्षा जनतेच्या आरोग्याला प्रथमिकता देत प्रचार आवरता घेतला होता. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून काँग्रेस पक्ष निकालावर मंथन करेल. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत स्थानिक मुद्दे आणि विठ्ठल कारखान्यांच्या थकित बिलांचा मुद्दा प्रभावी ठरल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. जनमताचा कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Tags:    

Similar News