आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडणाऱ्या भाजप नेत्याचं निलंबन
भाजप नेत्या आणि माजी आयपीएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी सीमा पात्रा यांनी घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यानंतर भाजपने सीमा पात्रा यांना निलंबित केलं आहे.;
माजी आयपीएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी सीमा पात्रा यांनी घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला आठ वर्षे घरात कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याबरोबरच सीमा पात्रा यांनी या आदिवासी महिलेला चाटून फरशी आणि शौचालय साफ करायला लावल्याचा आरोपही यावेळी महिलेने केला आहे. यासंदर्भात वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
भाजप नेत्या सीमा पात्रा यांचा आयुष्यमान याने महिलेला वाचवलं आहे. तर घरात घडणाऱ्या या घटनेची माहिती आयुष्यमान याने आपला मित्र विवेक बस्के याला दिली. त्यानंतर आयुष्यमान याने विवेक बस्के याच्या मदतीने पीडित महिलेची सुटका केली.
याप्रकरणी भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्याविरोधात झारखंडमधील रांची परिसरातील अरगोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर या घटनेवरून काँग्रेसने भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
झारखंडमध्ये घडलेल्या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. तर यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवेदन जारी करत पीडित महिलेने केलेले आरोप खरे असतील तर तातडीने आरोपी महिलेला अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
पीडित महिलेला सर्वोत्तम वैद्यकीय मदत आणि तिचे पुनर्वसन करण्यात यावं, असंही रेखा शर्मा म्हणाल्या.
भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेने आरोप केल्यानंतर भाजपने तातडीने सीमा पात्रा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.