सना खान हत्या प्रकरणाला वेगळं वळण, राजकीय क्षेत्रात होणार भूकंप

भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे.;

Update: 2023-08-22 03:43 GMT

भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या नेत्या सना खान यांची हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सना खानचा तथाकथीत पती अमित साहूला अटक केली. त्यानंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

भाजपच्या नेत्या सना खान यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या तथाकथीत पती अमित साहूकडून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे देशाच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजप नेता अमित साहू हा सना खानला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांकडे शारीरिक संबंधांसाठी पाठवत होता. त्यामध्ये अमित साहू आणि त्याची गँग सनाच्या माध्यमातून लोकांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ मिळवत होते. या व्हिडीओ आणि फोटोंचा धाक दाखवून अमित साहू लाखो रुपये उकळत होता. या सेक्स रॅकेटच्या माध्यमातून अमित साहूने मोठी संपत्ती जमवली.

त्यामुळे सना खान प्रकरणाला सेक्सटॉर्शन हा नवा अँगल मिळाल्याचे नागपूर शहराचे डीसीपी राहुल मदने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सना खान आणि अमित साहूचे प्रेम प्रकरण

दोन वर्षांपुर्वी सना खानची ओळख फेसबुकवर कुख्यात गुंड अमित साहूशी झाली होती. त्यानंतर सना खान मध्यप्रदेशात आयोजित केलेल्या भाजपच्या शिबीरात गेल्या. तेथे त्या पप्पू उर्फ अमित साहूच्या प्रेमात पडल्या. त्यातूनच अमित साहू आणि सना खान यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर सना खान आणि अमित साहूने लग्न केल्याचे म्हटले जाते. मात्र अमित साहूने त्यानंतर सना खानचा वापर भाजपचे मोठे नेते आणि पदाधिकारी यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी करायला सुरूवात केली. त्यातूनच अमित साहूने अनेक नेत्यांना सना खानच्या जाळ्यात ओढले आणि त्यांचे अश्लील व्हिडीओ काढले. त्यातून अमित साहू लाखो रूपये कमवत होता. याच पैशाच्या आणि सना खानच्या माध्यमातून अमित साहूला मध्यप्रदेशच्या राजकारणात प्रवेश करायचा होता. मात्र दरम्यान अमित साहूने सना खानचीच हत्या केली.

अमित साहूने सना खानची हत्या केल्यानंतर त्याला वेगवेगळे अँगल देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी अमित साहूचा मोबाईल जप्त केला आणि धक्कादायक माहिती समोर आली. अमित साहूच्या मोबाईलमध्ये सना खानच्या काही अश्लील व्हिडीओ क्लिप आढळून आल्या. एवढंच नाही तर अमित साहूच्या दबावामुळेच सना खान विविध पदाधिकारी आणि नेत्यांसोबत दिसल्याची चर्चा आहे. मात्र अमित साहूच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या क्लिप्सवरून पोलिसांनी अमित साहूवर आयटी एक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

अमित साहूच्या मोबाईलमधील क्लिप्स बाहेर आल्या तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधील अनेक मोठ्या नेत्यांची पदं धोक्यात येऊन राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सना खान प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने सुरू असतानाच अमित साहूच्या मोबाईलमुळे या प्रकरणाला सेक्सटॉर्शनचे वेगळे वळण मिळाले आहे.

Tags:    

Similar News