अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला NCBने ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक केली आहे. पण आता या कारवाईवरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. NCBने गेल्या शनिवारी रात्री मोठी कारवाई करत एका क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना NCBने अटक केली होती. त्या क्रूझवर ड्रग्जही जप्त करण्यात आले होते. सध्या आर्यन खान NCBच्या कोठडीत आहे. पण आता या कारवाईमध्ये भाजपचा एक पदाधिकारी NCBचा अधिकारी म्हणून सहभागी झाला होता, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
NCB संस्थेचे कामकाज गेली ३६ वर्षे एकदाही संशयास्पद वाटले नाही. पण गेल्या वर्षभरात सुशांत सिंहच्या प्रकरणापासून NCBच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात आले आणि ड्रग्समुळे त्याची हत्या झाली अशा बातम्या यायला लागल्या. तसेच तेव्हापासून बॉलिवूडला बदनाम करण्यात आले आणि कलाकारांना समन्स देऊन बोलावण्यात येऊ लागले, अशी टीका मलिक यांनी केली.
असाच प्रकार आर्यन खानबाबत घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "३ ऑक्टोबरला NCBने क्रूझवर छापा टाकला. त्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून काही व्हिडीओ दाखवण्यास सुरुवात केली. यात NCBने या कारवाईत ज्यांना ताब्यात घेतले होते त्यांचे व्हिडिओ होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये एक अधिकारी आर्यन खानला NCBच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असल्याचे दिसते. त्यांनर त्याच व्यक्तीचा आर्यन खान सोबत काढलेला सेल्फीही व्हायरल झाला. त्यानंतर एएनआयच्या बातमीनुसार NCBच्या दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी ती व्यक्ती आपली अधिकारी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही व्यक्ती कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे," असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
ती व्यक्ती NCBची अधिकारी नव्हती तर आर्यन खानला कार्यालयात कशी घेऊन आली? याचा जाब NCBला द्यावा लागेल, असे मलिक यांनी म्हटले आहे. तर एएनआयच्या आणखी एका व्हिडीओमध्ये दुसरा आरोपी अरबाज मर्चंटला घेऊन जाणारी व्यक्ती खोटी असल्याचा दावाही मलिक यांनी केला. पहिल्या व्हिडीओमधील व्यक्ती केपी गोसावी आणि दुसऱ्या व्हिडिओतील व्यक्ती भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुषाली असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. एवढेच नाही तर मनिष भानुषालीचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबतही आहेत, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आता NCB राष्ट्रवादीच्या या आरोपांवर काय उत्तर देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.