१०० दिवसानंतर बिगबॉस मराठी सिजन-४ चा विजेता ठरण्याचा मान मिळालाय अक्षय केळकरला...१९ स्पर्धकांमधून अक्षयने बाजी मारत आपले नाव विजेतेपदावर कोरले. तर अपूर्वा नेमळेकर ही या सीजनची उपविजेती ठरली. विजेत्या ठरलेल्या अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार रुपये आणि विजेतेपदाची ट्रॉफी देवून सन्मानीत करण्यात आले आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजता बिगबॉस मराठी सिजन-४ चा ग्रॅन्ड फिनाले पार पडला. राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर हे शेवटचे पाच स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत होते. मात्र शेवटी टॉप तीनमध्ये किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे स्पर्धक उरले होते.
अभिनेता अक्षय केळकर याचे वडील मुंबईमध्ये रिक्षा चालवतात. अक्षय बिगबॉसच्या सेटवर वडीलांच्या रिक्षातूनच पोहचला होता. अक्षय केळकरने २०१३ मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले होते. 'बे दुणे दहा' या मालिकेतून अक्षयने आपल्या अभिनयाला सुरवात केली होती. आणि या मालिकेमध्ये त्याने आपली चांगलीच चुणुक दाखवून दिली होती. 'कमला' या मालिकेतही त्याने काम केले होते. प्रेमासाठी, कान्हा, माधूरी, कॉलेज कॅफे या चित्रपटात सुद्धा त्याने अभिनय केला आहे. 'बाकरवडी' या हिंदी मालिकेमध्येही त्याने काम केले आहे. बिगबॉस मध्ये त्याने तो गेली ८ वर्ष एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्याने तिचे नाव रमा असल्याचे सांगितले होते. पण हे टोपणनाव त्याने रमा-माधव या जोडीवरुन ठेवल्याचे सांगितले होते.
'गोदावरी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिगबॉसच्या घरात जितेंद्र जोशी गेला होता. त्यावेळी त्याने अक्षयला रमाचे पत्र वाचून दाखवले होते. त्यावेळी अक्षय खुप हळवा झाला होता. अक्षय केळकर जेव्हापासून बिगबॉसच्या घरामध्ये गेला, तेव्हापासून त्याने आपले वेगळेपण दाखवून दिले. मग तो खेळ असो किंवा एखादा टास्क असो....त्याने वादही घातले मात्र त्यातून तो अलगद बाहेरही आला आणि आज तो बिगबॉस मराठी सिजन-४ चा विजेता ठरला.