भंडारा बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष बलात्कारामुळे महाराष्ट्र हादरला आहे. तर यावरून राज्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.;
भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर पाशवी अत्याचार झाल्याच्या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. तर विरधकांकडून राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असल्याची टीका केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भंडारा बलात्कार प्रकरणावर सरकार गंभीर आहे. मी स्वतः डीजींशी बोललो आहे. तसेच स्वतः फोन करून सिव्हिल सर्जनला तिच्या प्रकृतीविषयी सूचना केल्या आहेत. तसेच जे या प्रकरणात आरोपी आहेत. त्या सर्वांना कठोर शासन व्हावं, ही माझी भूमिका आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. त्याबरोबरच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नागपूर मेडीकल कॅालेजचे डिन डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी दुरध्वनी संपर्क माध्यमातून पिडीत महिलेची प्रकृतीची विचारणा केली. तसेच पोलिसांनाही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यात महिला गृहमंत्री असती तर अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना वचक राहिला असता. याबरोबरच राज्यातील शिंदे सरकारवर ही नीलम गोऱ्हे यांनी टीकास्र सोड़ले.