अवैध गर्भपात प्रकरण; गर्भलिंग निदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरच्या औरंगाबादमधून आवळल्या मुसक्या..!
अवैध गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी प्रकरणांमध्ये, बीड पोलिसांना यश आले आहे. औरंगाबाद मधुन गर्भलिंग निदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आलंय. सतीश बाळू सोनवणे असं अटक करण्यात आलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे.
बीडच्या बक्करवाडी येथील शीतल गाडे वय 30 या महिलेचा, अवैध गर्भपात करतांना 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात मयत शितल गाडे यांच्या पतीसह सासरा , भाऊ आणि तर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी सीमा डोंगरे हिचा पाली येथील तलावात मृतदेह आढळून आलाय.
तर पकडण्यात आलेल्या सतीश सोनवणे याने शीतल गाडे या महिलेचे गर्भलिंग निदान केल्याची कबुली दिली आहे.हा आरोपी औरंगाबाद येथून नगर या ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केलीय. तर गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनवणे हा 10 हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलीय.
दरम्यान आरोपी सतीश सोनवणे हा यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका डॉ.गवारे नावाच्या व्यक्तीचा असिस्टंट म्हणून काम करत होता. तसेच मनीषा सानप ही सोनवणे ला फोनद्वारे माहिती देऊन बोलावून घ्यायची आणि सानपच्या घरी गर्भलिंग निदान केलं जायचं. त्यामुळं आता या सर्वांनी आतापर्यंत किती जणांचे गर्भलिंगनिदान केले असून किती जणांचा गर्भपात केला आहे ? यासाठी एजंट मनीशा सानप हिचा बीड पोलिसांकडून पीसीआर मागण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकं कोण कोण आहेत ? हे चौकशी अंती निष्पन्न होणार आहे, असं पोलिस अधिक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परीषदेत सांगितलं.