Bank Robbery : ATMमध्ये CCTV नाही आणि गार्ड पण नाही, दरोडेखोरांनी संधी साधत लुटले ५६ लाख
रायगड जिल्ह्यातील पेण शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि दुकाने फोडून चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यातच मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल 56 लाखांना गंडा घालत पोलिसांना आव्हान दिले आहे.
पेण शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर गेल्या महिन्यात शहरातील तरणखोप येथील घरात लाखो रुपयांच्या चोरीची घटना घडली होती. तर पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील आठ दुकाने फोडल्याची घटनाही ताजी आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल 56 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे.
पेण शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सनसिटी इमारतीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा टाकत दरोडेखोरांनी 56 लाख 34 हजार 800 रुपये लंपास केल्याची घटना घडली. तर दरोड्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासणीकरता फॉरेन्सिक पथकही पाचारण केले होते. त्याचप्रमाणे दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी डॉग स्कॉडची मदतही घेण्यात आली.
मागिल काही दिवसांमध्ये पेण शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र अजूनही पोलिस चोरट्यांना पकडू शकले नाहीत. त्यातच आता चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून 56 लाखांची रक्कम लंपास केली आहे. तर गॅस कटर आणि गॅस टाकी एटीएममध्येच टाकून चोरट्यांनी पलायन केले आहे. मात्र शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिस चोरांना पकडू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.
दरम्यान समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे एटीएमवर पडलेल्या दरोड्यामुळे बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेराही लावला नसल्याचे समोर आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी एटीएमवर सुरक्षा रक्षकही नेमला नव्हता. त्याचाच फायदा दरोडेखोरांनी घेत 56 लाखांना गंडा घातला. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.