हुकूमशाहीचा अंत करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधात महाराष्ट्रासह दिल्ली एकत्र असल्याची घोषणा उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.;
'अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी न्यायालयानं मंजुरी दिली पाहिजे' असं परिपत्रक मोदी सरकारनं अंमलात आणलं आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान मोदी हे मनमानी कारभार करत आहेत. भाजपचे नेते सार्वजनिकरित्या न्याय व्यवस्थे विरोधात बोलतात, सोशल मीडियावर कॅम्पेन्स चालवतात. कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाहीत. 2015 मध्ये आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीमध्ये निवडून आली होती. तेव्हा देखील मोदी सरकारने आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता.
त्यासाठी ऑपरेशन लोटसचा प्रयोग केला होता. मात्र, आमच्या आमदारांनी त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला म्हणून त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावण्याचं काम भाजप करत आहे. आता असाच प्रकार शिवसेने सोबत करत आहेत.
मोदींचं सरकार लोकशाही सरकार नसून हुकूमशाही सरकार असल्याची टीका मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली. याच हुकूमशाहीचा अंत करण्यासाठी आम्ही आज एकत्र आले आहोत असं देखील केजरीवाल यावेळी म्हणाले.