आश्वासन न पाळणाऱ्या केंद्र सरकारवर अण्णांचं पुन्हा विश्वास, अण्णांचं आंदोलन स्थगित
नव्या कृषी कायद्या विरोधात आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. या मागणीसाठी अण्णा हजारे येत्या 30 जानेवारी पासून आंदोलन करणार होते. मात्र, केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन स्थगित कऱण्याची घोषणा केली आहे. अण्णा हजारे यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी ही घोषणा केली.
या संदर्भात माध्यमांशी बोलताना अण्णा म्हणाले...
अनेक वर्ष मी समाज आणि राष्ट्रहितासाठी आंदोलन करत आलो. घटनेने दिलेला अधिकार आहे. अन्याय अत्याचार जर होत असेल तर अहिंसेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं हा दोष नाही. आणि म्हणून मी अनेक वर्ष हे करत आलो. आता या वेळेला चार वर्षापासून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या करतो. तो त्याचं पीक जे काढतो. त्या पिकावरती जो खर्च आला. तो खर्च त्याला मिळत नाही. स्वामिनाथन जो आयोग आहे. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल सरकारने स्विकारलेला आहे. आणि स्वामिनाथन आयोग म्हणतोय की लागत मूल्य (म्हणजे जो खर्च शेती करण्यासाठी आला) त्यांच्या पेक्षा पन्नास टक्के वाढवून द्या. मग तो आत्महत्या करणार नाही. आणि ते सरकारने मान्य केलं आणि मला पण लेखी आश्वासन दिलं.
त्याच्यामुळं मी हे प्रयत्न करत करत इथंपर्यंत आलो. पण दिलेलं आश्वासन पाळले नव्हते. म्हणून मी उपोषण करण्याचं ठरवलं होतं. पण आता केंद्र सरकारने आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चौधरी हे त्यांचा निरोप घेऊन आले. की आमच्याकडून उशीर झाला. पण आम्ही तुम्ही सुचवलेले मुद्दे करायला तयार आहोत. आपण 15 मुद्दे दिले आहेत. आणि मला विश्वास वाटतो. या 15 मुद्द्यावरती सर्वोच्च कमिटीने विचार केला तर शेतकऱ्यांसाठी बरचसं काम होऊ शकेल. यांच्यावर माझा विश्वास निर्माण झाला. म्हणून मी उद्या जे उपोषण करणार होतो. ते आता स्थगित केलेलं आहे.
पाहा काय म्हणाले अण्णा हजारे