ठाकरे गटाला एकामागून एक जबर धक्के बसत आहेत. आता ठाकरे गटाच्या मुख्य महिला नेत्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनच्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर शिवसेना नेते माजी मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली.
डॉ.निलम गो-हे यांना शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना पक्षाने भरभरून दिलं असेच लोक आता शिवसेने वर वार करत आहेत. निलम गो-हे यांना शिवसेनेने चार वेळा विधानपरिषदेची उमेदवारी दिली. विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं. चार टर्म शिवसैनिकांच्या मेहनतीवर आमदारकी भोगली, शिवसैनिकांच्या जोरावर आतापर्यंतची आणि पदं भोगली. त्या शिवसैनिकांना आता किती यातना होत असतील हे मला चांगलं माहिती आहे. पक्ष सोडणारे, पक्ष बदलणारी लोकं खूप आहेत. पक्षाच्या वाईट दिवसात लाखो कार्यकर्ते आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे संधीसाधू लोकं जरी गेली असली तरी त्यांची जागा आम्ही भरून काढू, त्याची आम्ही काळजी करत नाही. दुःखाची गोष्ट ही आहे की, अशी पदं भोगल्यानंतर पक्षाला दगा देणार असतील, पक्षावर वार करणार असतील. त्या आता गेल्यात त्यांना काही आश्वासनं मिळाली असतील ती पूर्ण व्हावीत, अशी आमची अपेक्षा आहे. नाहीतर ना इकडच्या ना तिकडच्या अशी अवस्था त्यांची होऊ नये असं वाटतं, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) नेते अनिल परब यांनी दिली.