नांदेडमधील दुर्दैवी घटनेत ३१ जणांना जीव गमवावा लागला. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आई व मूल दगावलेल्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत घेत शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अंबादास दानवे म्हणाले, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाचा कळस आहे असे माझे स्पष्ट मत आहे. औषधांची कमतरता, निष्काळजीपणा, वर्षानुवर्षे मंजुरीसाठी पडून राहिलेल्या फाईली हेच या घटनेच्या मागचे कारण आहे. कोणत्या डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली, ज्याची किंमत तिला आणि तिच्या बाळाला जीव देऊन चुकवावी लागली? सरकार सांगेल का? असा सवालं दानवे यांनी उपस्थित केला.
दरम्यान अंबादास दानवे म्हणाले, मनुष्यबळ अपुरे असेल तर ते का दिले गेले नाहीत? इथे लोक मारतात आणि सरकारचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला मुजरा मारायला जातात, हे वाईट आहे. तातडीने आनंदाचा शिधा मंजूर होतो पण औषधी आणि रुग्णालयात सुविधा देण्यासंबंधीच्या फाईली लाल फितीत अडकतात, हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? पालकमंत्री नियमितपणे रुग्णालयात येऊन बसले, आढावा घेतला तर डॉक्टरांची निष्काळजीपणा करण्याची हिंमतच होणार नाही. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना शौचालय साफ करायला लावल्याचे समोर आले आहे. त्यावरही अंबादास दानवे यांनी टीका केली. अंबादास दानवे म्हणाले, रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शौचालय स्वच्छ करायला लावणे निंदनीय आहे. घाण असेल तर ती स्वच्छ करायला नेमून दिलेली माणसे बोलावता आली असती असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे.