अमरावतीच्या उमेश कोल्हेच्या हत्येचे कारण पोलिसांनी का लपवले?
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचे कारण पोलिसांना आधीच माहिती असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी दिली आहे.;
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले होते. त्यानंतर नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. तर याच कारणातून 21 जून रोजी अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे याची हत्या करण्यात आली. मात्र पोलिसांनी उमेश कोल्हे याच्या हत्येचे कारण लपवल्याचे समोर आले आहे.
२१ जून रोजी अमरावतीतील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. ते आपलं दुकान बंद करून आपला मुलगा आणि सूनेसोबत घरी जात होते. यावेळी तीन दुचाकीस्वारांनी कोल्हेंवर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान कोल्हे यांनी नुपूर शर्माचे स्टेटस ठेवले होते. त्यामुळेच त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्यानंतर NIA आणि ATSचं पथक अमरावतीत दाखल झालं होत. दरम्यान उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली होती.
दरम्यान राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैया लाल या टेलरची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. तर ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणातून घडल्याची खळबळजनक माहिती समोर आली. त्यानंतर अमरावती येथील उमेश कोल्हे याची हत्या नुपूर शर्मा प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा संशय खरा असल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र देशभरात याविषयी संतापाची लाट उसळल्याने आणि हे प्रकरण संवेदनशील असल्यानेच पोलिसांनी ही माहिती उघड केली नाही, असे अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी हत्येच्या सूत्रधारासह सात संशयितांना ताब्यात घेतले असून अजून एका व्यक्तीचा शोध सुरू आहे, अशी माहिती आरती सिंग यांनी दिली.
अमरावती प्रकरणाविषयी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अमरावतीची घटना अत्यंत गंभीर आहे. आरोपी मास्टरमाईंड पकडला गेला आहे. एनआयए त्याचा तपास करत आहे आणि काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का? ते शोधत आहे. सुरुवातीला ही चोरी असल्याचे चित्रित करण्यात आले होते. त्याचाही तपास केला जाईल," अशी माहिती यावेळी दिली.