राज ठाकरे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अजित पवार यांचे टीकास्र
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांची मिमिक्री करत टीका केली होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेताना म्हटले की, त्यांना नकला आणि टीकेशिवाय काहीही जमत नाही. ते सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांचे तोंडभरून कौतूक मग आता असा काय चमत्कार झाला? असा सवाल अजित पवार यांनी केला.
मुलाखत घेतांना राज ठाकरे यांना शरद पवार हे जातीयवादी वाटले नाहीत. मग आता काही दिवसात त्यांना अचानक जातीयवादी कसे वाटू लागले? शरद पवार हे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आज आहेत का? ते 1962 पासून युवक काँग्रेसमध्ये काम करत आहेत. त्यावेळी तुमचा जन्मही नव्हता झाला असा टोला अजित पवार यांनी लगावला.
शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. राज ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.