तालिबानची झोप उडवणारा अहमद मसूद आहे कोण?

अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला कोण रोखणार असा प्रश्न संपूर्ण जगापुढे निर्माण झाला आहे. पण आता तालिबानला अफगाणिस्तानच्याच भूमीत आव्हान देण्यात आले आहे. इथला एक प्रांत अजूनही स्वतंत्र असून आता तालिबान विरोधकांचे केंद्रस्थान बनला आहे.

Update: 2021-08-23 13:20 GMT

Photo courtesy : social media

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला आणि तालिबानची दहशत काय आहे हे काबूल विमानतळावरील दृश्यांवरुन संपूर्ण जगावे पाहिले....जीव वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱे नागरिक जगाने पाहिले....आपल्या पोटच्या गोळ्याला तालिबानपासून लांब नेण्यासाठी आटापिटा करणाऱ्या माता पाहिल्या...आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य अंधारात जाऊ नये यासाठी जीवाच्या आकांताने मुलांना घेऊन पळणारे बापही याच विमानतळाच्या धावपट्टीवर धावताना जगाने पाहिले.



 


एकीकडे देशाची जनता केविलवाणे प्रयत्न करत असताना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एका रात्रीतून देश सोडून पळून गेले. अमेरिकेने हात वर करत तालिबानला विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले आणि अफगाणी जनतेच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या. तालिबान्यांनी देशात आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरूवात केली खरी पण एका ठिकाणी मात्र तालिबानच्या आकांक्षांना ब्रेक लागला आहे. हा ब्रेक लावला आहे अहमद मसूदने...

कोण आहे अहमद मसूद?

अहमद मसूद हा शेर-ए-पंजशीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. अहमद शाह मसूद हे तालिबानविरोधात नेते म्हणून प्रसिद्ध होते. १९८०मध्ये त्यांनी अफगाणिस्तानात रशियन फौजांना सळो की पळो करुन सोडले होते. तालिबानला सडेतोड उत्तर देणाऱ्या शेर-ए-पंजशीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. अहमद शाह मसूद यांची तालिबान्यांनी २० वर्षांपूर्वी हत्या केली होती. आता त्यांच्याच मुलगा अहमद मसूदने तालिबानला आव्हान दिले आहे.



 


संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाला असला तरी पंजशीर प्रांत मात्र अजूनही तालिबानच्या ताब्यात नाहीये. २० वर्षांपूर्वी देखील तालिबानला पंजशीर प्रांतावर ताबा मिळवता आला नव्हता. आता त्याचीच पुनरावृत्ती सध्या अफगाणिस्तानात झाली आहे. तालिबानविरोधातल्या बंडखोरांचा बालेकिल्ला म्हणून आता पंजशीर खोऱ्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागले आहे.

तालिबानविरोधातल्या बंडखोरांचे नेतृत्त्व नॉर्दन अलायन्सचे प्रमुख अहमद मसूद करत आहेत. अहमद मसूद यांना अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह आणि इतर काही तुकड्या येऊम मिळाल्या आहेत. सध्या अहमद मसूद यांच्याकडे पंजशीरमध्ये १० हजार सैनिकांची ताकद जमा झाली आहे.



 

अहमद मसूदची जगाला हाक

National Resistance Front of Afghanistan चे नेतृत्व सध्या अहमद मसूद करतो आहे. अहमद मसूदने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख लिहून जगाला साद घातली आहे. "तालिबानविरोधात संघर्षासाठी सज्ज असलेल्या मुजाहिदीन लढवय्यांसोबत मी पंजशीरमघ्ये आहे आणि इथूनच लेख लिहित आहे. ही वेळ येणार आहे हे आम्हाला माहिती होते म्हणून आम्ही भरपूर शस्त्रास्त्र साठवून ठेवली आहेत. माझ्या वडिलांच्या संघर्षाच्या काळापासून आम्ही ही शस्त्र लपवली आहेत. तालिबान ही केवळ अफगाणिस्तानची समस्या नाही तर तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तान हा जगभरातील लोकशाही देशांविरोधातील इस्लामिक दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. आम्ही कुठे संघर्षाला सुरूवात केली आहे, शरणागती हा शब्दच आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी आमच्या मदतीला यायला हवे" असे आवाहन मसूदने केले आहे.

त्यामुळे आता तालिबानविरोधातल्या बंडखोरांचे पंजशीर खोरे हे केंद्र बनले आहे. इथूनच आता तालिबानविरोधातला लढा लढला जाणार आहे.

Tags:    

Similar News