गुणरत्न सदावर्तेंला साताऱ्यातही दणका : न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी
दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्तेंला मुंबईतून ताब्यात घेतल्यानंतर साताऱ्यात सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.;
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यानंतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मराठा आरक्षणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दीड वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी गुरुवारी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या एका जुन्या प्रकरणात अॅड गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर तारळे (ता पाटण) येथील राजेंद्र निकम यांनी त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अॅड. सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती.