Panjab election : आपची मोठी घोषणा, पंजाबसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर
पंजाब विधानसभेच्या निवडणूकीत रंगत आली आहे. तर मंगळवारी आम आदमी पक्षाने पंजाबसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करून प्रचारात आघाडी घेतली आहे.
दिल्लीतील सत्तास्थापनेनंतर आम आदमी पक्षाने पंजाब आणि गोव्याकडे वळवला आहे. तर पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या दहा याद्या प्रसिध्द करत उमेदवार निश्चित केले आहेत. तर त्यापाठोपाठ आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत आघाडी घेतली आहे.
दरम्यान भाजप आणि काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविना निवडणूक लढवणार आहेत. मात्र आम आदमी पक्षाने पंजाबसाठी आपचे दोन वेळा लोकसभा सदस्य राहिलेल्या भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले आहे. त्यामुळे पंजाबसाठी आम आदमी पक्ष भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे, अशी घोषणा आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोहाली येथे केली.
आप ने पंजाबसाठी कंबर कसली आहे. तर पक्षाने पंजाबसाठी जाहीरनामा जारी करत मोहल्ला क्लिनिक, मोफत वीज, पाणी यांसह शेतकऱ्यांसाठीही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
आप ने पंजाबमध्ये लोकशाही पध्दतीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी जनतेचा कौल घेतला. त्यामध्ये 21 लाख 59 हजार लोकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी 93 टक्के लोकांनी भगवंत मान यांच्या नावाला पसंती दर्शवली. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांचे नाव जाहीर करत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन होणार आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी लोकशाही पध्दतीने जनतेचे मत मागितले. होते. त्यामध्ये भगवंत मान यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाल्याने त्यांचे नाव जाहीर केले. भगवंत मान हे माझ्या धाकट्या भावासारखे आहेत. मी त्यांचे नाव आधीच जाहीर केले होते. मात्र लोक घराणेशाहीचा आरोप करतील त्यामुळे आम्ही लोकशाही प्रक्रीयेने लोकांची मते मागवली. त्यानुसारच भगवंत मान यांची निवड झाली आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी भगवंत मान यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भगवंत मान म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी आणि पंजाबच्या जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करीन. तर मी प्रत्येक पाऊल टाकताना तीन कोटी पंजाबी लोकांना आणि तुम्हाला अभिमान वाटेल, याचा विचार करीन.
पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी होणारी निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. तर 20 फेब्रुवारी रोजी पंजाबसाठी मतदान होणार आहे.