वर्ध्यात पटेल चौक परिसरात जीर्ण इमारतीची भिंत कोसळली ; वाहनांचे मोठे नुकसान
वर्धा : वर्धा शहरातील जुनी नगर परिषद कॉम्प्लेक्समधील पटेल चौक परिसरात जीर्ण इमारतीची भिंत कोसळल्याची घटना घडली,सुदैवाने परिसरातील नागरिक बचावले पण वाहनांचे मोठे नुकसान झाले. आज दुपारी ही घटना घडली,प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आपला जीव कसा बसा वाचवला. प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार या भिंतीखाली 1 ते 2 जण दबल्या गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने ही दुर्घटना घडली व बघणाऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे.
या इमारतीवर मोठ्या भेगा देखील दिसून येत असल्याने इमारतीचा आणखी भाग कोसळण्याची शक्यता आहे,सुदैवाने या घरात राहणारे लोक बाहेरगावी गेल्याने त्यांचा जीव वाचाला आहे. या इमारतीत काही लोक भाडोत्री राहत असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी,यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे, नक्की कोणी या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत का याचा शोध घेणे सुरू आहे.जेसीपीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा उचलण्याचे काम सुरू आहे.