Exclusive: शिवसेना सत्तेत असूनही 'बाळासाहेब ठाकरें'च्या नावाची योजना बंद पडण्याच्या मार्गावर
शिवसेनेला राज्यात सत्तेत येऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे तर औरंगाबादमध्ये शिवसेना सत्तेत असूनही इथे पक्षावर एक नामुष्की ओढवली आहे.;
औरंगाबाद : राज्यात शिवसेनेची सत्ता असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. मात्र असे असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू असलेली मोफत अंत्यसंस्कार योजनेचे पैसे थकल्याने स्मशानजोगी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शिवसेनेचे माजी खासदार यांनी समोर आणला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेत गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. एवढेच नाही तर संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल विधानसभेत तर अंबादास दानवे विधानपरिषदेत आमदार आहेत. मात्र असे असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू असलेली मोफत अंत्यसंस्कार योजनेतील कर्मचाऱ्यांचे गेल्या 6 महिन्यांपासून वेतन थकले आहेत आणि योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तस पत्र त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला लिहलं आहे.
खैरे यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे गेल्या ६ वर्षांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना सुरु केलेली आहे. गेल्या १० महिन्यापासून कोरोना या संसर्गजन्य काळातही या मोफत अंत्यसंस्कार योजने अंतर्गत मृतदेहांवर बचतगटाच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या कोरोना काळात महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत काही स्मशानजोगिंना आपला जीवही गमवावा लागला. मात्र असे असताना मोफत अंत्यसंस्कार योजनेचे पैसे वारंवार थकत असल्यामुळे स्मशानजोगी आर्थिक अडचणीत सापडला असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली असल्याच खैरे यांनी म्हंटलं आहे
स्मरशानजोगीनी थकीत रक्कम मिळावी म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्वांना निवेदने देऊन वारंवार मागणी करुनही रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशा परिस्थितीत मोफत अंत्यविधी करण्याकरीता लाकडे आणण्यासाठी पैसे नसल्याने व कंत्राटदाराचे पैसे थकीत असल्याने त्यांनी स्मशानजोगींना लाकडे देणे बंद केले. त्यामुळे यापुढे या योजनेचा लाभ जर इतर मागासवर्गीय,मागासवर्गीय,गरजूंना मिळाला नाही तर महानगरपालिकेची नामुष्की सर्व जनतेसमोर येवून नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही असा इशाराही खैरे यांनी दिला आहे.