मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली गाडी सापडल्याप्रकरणी NIAने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर आता तपासात आणखी एक माहिती समोर आल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकं भरलेली कार सापडली होती. त्या दिवसाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपसाणी सध्या NIA करत आहे. यामध्ये अंबानी यांच्या घराजवळून एक व्यक्ती पीपीई किट घालून जात असल्याचे दिसते आहे. ही व्यक्ती म्हणजे सचिन वाझे असल्याचा संशय NIA ने व्यक्त केल्याचे वृत्त ANIने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
ज्या स्कॉर्पिओमध्ये ही स्फोटकं सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यानंतर वाझे यांची बदली करण्यात आली. पण त्यानंतर याप्रकरणाचा तपास NIAने हाती गेतला. सचिन वाझे यांची तब्बल १२ ते १३ तास चौकशी केल्यानंतर NIA त्यांना अटक केली आहे. वाझे यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्या स्कॉर्पिओ सोबत जी इनोव्हा सीसीटीव्हीमध्ये दिसली होती, ती पोलिसांची असल्याचे वृत्त सुद्धा काही माध्यमांनी दिले आहे.