मुंबई – ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावर लोकल रेल्वे बंद पडल्यानं ट्रॅकच्या बाजून चालत असतांना हातातील सहा महिन्यांचं बाळ हातातून पडून नदीत वाहून गेलं. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतलाय.
मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईतील रेल्वे सेवा प्रभावित होते. रेल्वे ट्रॅकवर अनेक ठिकाणी पाणी साचतं. त्यामुळं रेल्वे तासन् तास ट्रॅकवरच उभी राहते. अशा परिस्थितीत प्रवासी रेल्वेतून खाली उतरून ट्रॅकवरून किंवा ट्रॅकच्या शेजारून आपापल्या घराच्या दिशेने रवाना होतात. हे चित्र दरवर्षी साधारणपणे पावसाळ्यात दिसतं. बुधवारी (१९ जुलै) मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं लोकल रेल्वे सेवा प्रभावित झाली होती. याच दरम्यान ठाकुर्ली इथं लोकल थांबविण्यात आली. याच लोकलमध्ये हैदराबादच्या योगिता रूमाले भिवंडीमध्ये आपल्या माहेरी प्रसूतीसाठी आल्या होत्या. त्या सहा महिन्यांच्या ऋषिकाला घेऊन आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी डॉक्टरांकडे जात होत्या. त्यातच लोकल बंद पडल्यानं योगिताच्या वडिलांनी ऋषिकाला कडेवर घेतलं. आणि योगितासह ते लोकलमधून खाली उतरले. त्याचवेळी ते ट्रॅकच्या बाजूने चालत असताना ऋषिका आजोबांच्या हातातून निसटली आणि खाली असलेल्या उल्हास नदीत वाहून गेली. हे सगळं एका क्षणात घडलं.
उल्हास नदीत वाहून गेलेल्या सहा महिन्यांच्या ऋषिकाचं शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. आपत्ती दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान हे शोधकार्य करत होते. आधारवाडी ते दिवा, मुंब्रा खाडी किनारा परिसरात चिमुकलीचा शोध घेण्यात आला. पण ती सापडली नाही. त्यामुळे रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. लोकल एका जागी थांबल्यास रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून त्या रेल्वेची पाहणी केली जाणार आहे. अशावेळी लोकलमधील प्रवाशांची मदत रेल्वे पोलीस आणि प्रशासन करणार आहे.