सामूहिक बलात्कार पीडित महिलेला ठरवले चारित्र्यहिन, बीड जिल्ह्यातील प्रकार

Update: 2020-12-28 14:14 GMT

पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का लावणारी आणखी एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. यावेळी तर एका ग्रामपंचायतीने कायद्याचे उल्लंघन करत एका महिलेवर अन्याय केला आहे. संबंधित महिला चारित्र्यहीन असल्याचे सांगून ग्रामपंचायतने महिलेस गावाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ही घटना बीड़ जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील वसंत तांडा गावात घडली. याच परिसरात पीड़ित महिला राहते. काही महिन्यापूर्वी पीड़ित महिलेवर वसंत तांडा या वस्तीमधील 6 लोकांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्या संदर्भात गुन्हा दाखल व कोर्टात सिद्ध होऊन सदर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. या प्रकरणात ऑगस्ट महिन्यात विशेष ग्रामपंचायत सभा सरपंच संगीता संजय राठोड़ यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती. या सभेमध्ये फक्त पीड़ित महिलेचा विषय घेवून सदर महिला ही चारित्र्यहीन असून पुरुषांना बलात्काराची केस टाकेन अशी धमकी देवून पैसे उकळत असते किंवा धमकावत असते. त्यामुळे सदर महिलेपासुन गावाला धोका असल्याने या महिलेस गावबंदी करून तिला गावाच्या हद्दीबाहेर करीत आहोत असा ठराव घेण्यात आला आहे आणि त्यावर ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांच्या सह्या देखील आहेत.

एवडेच नाहीत तर याच प्रकारचा अर्ज गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना देखील देऊ केला असून त्या अर्ज़ात देखील तीच मागणी करण्यात आली आहे.

वास्तविक ग्रामपंचायतीला असा ठराव घेता येत नाही, गावातील नागरिक व सरपंच यांना जर कायदयाचे ज्ञान नसेल तर त्यासंदर्भात माहिती व जाणीव करून देण्यासाठी ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये असतात.पण त्यांनीही या प्रकरणात काही केलेले दिसत नाही.

यासंदर्भात गटविकास अधिकारी सानप यांना विचारले असत्ता, ग्रामपंचायतीला असा ठराव घेता येत नाही, त्यामुळे आपल्याकडे हे प्रकरण आल्यास त्या ग्रामपंचायतीवर कायद्याच्या तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.



Tags:    

Similar News