कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाचा नरबळी दिला गेल्याचा आरोप झाला होता. असाच आणखी एक प्रकार पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घडला आहे. एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह हळदी कुंकू लावलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत मुलगा हा 7 वर्षांचा होता. आरव केशव केशरे असे त्याचे नाव होते. आरवचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल होते. त्यानंतर मंगळवारी आरवचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकलेला आढळून आला. मंगळवारी पहाटे 6 वाजता आरवचा मृतदेह सापडला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पण हा नरबळी असल्याचे पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.