डोंबिवली स्फोट प्रकरण; 64 जण जखमी, 10 जणांचा मृत्यू
डोंबिवली ब्लास्ट प्रकरणात मोठी अपडेट; मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांचा मोठा खुलासा;
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा या ठिकाणी गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अमुदान या केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की दोन किमीपर्यंत याचे हादरे जाणवले. विशेष म्हणजे एकामागून एक असे तीन स्फोट झाल्याची माहिती मिळाली. स्फोटानंतर अमुदान कंपनीत भीषण आगडोंब उसळला. थोड्या थोड्या वेळानं छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू येत होते. या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसरातील साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला. हे स्फोट इतके भीषण होते की आसपासच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात फेज 2 इथे एका कंपनीत भीषण स्फोटानंतर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ब्लास्टमध्ये 64 जण जखमी झाले आहेत, तर दहा जणांचा मृत्यू झाला असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. मात्र अजूनही काहीजण कंपनीमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता असलेल्या कामगारांचे नातेवाईक या कंपनीच्या बाहेर उभा आहेत. सध्या याठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
या प्रकरणी मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती आणि मलय मेहता हे दोघेही घटनेच्या वेळी घटनास्थळी नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.