भाजपच्या जातीवादाला धर्मनिरपेक्षता हेच उत्तर आहे- जयंत पाटील

Update: 2021-10-14 12:52 GMT

भारतीय जनता पक्ष या देशात जो टोकाचं जातीयवादी करतो त्याला जातीवाद हे उत्तर नसून धर्मनिरपेक्षता हेच उत्तर आहे,त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येत जातीवादाला उत्तर देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे ते लातूरच्या उदगीर येथे बोलत होते.

उदगीर नगरपंचायतीत एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. सोबतच काँग्रेसच्या मंडळींनी राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी मदत केली आहे त्यामुळे येत्या काळात आपली लढाई ही काँग्रेससोबत नाही तर भाजपसोबत आहे हे लातुरच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं असही पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमला या निमित्ताने मोठे खिंडार पडले आहे. या पाचही विद्यमान नगरसेवकांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे एमआयएमला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, आता राज्यभरात राष्ट्रवादीकडे येणाऱ्या युवकांचा ओढा जास्त आहे, त्यातच एमआयएममधून बाहेर पडलेल्यांची पहिली पसंती ही राष्ट्रवादी आहे याचा मनस्वी आनंद वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यावरून अल्पसंख्याक समाज पुन्हा एकदा राष्ट्रवादीसोबत जोडला जात आहे , त्या सर्वांचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यावतीने मी स्वागत करतो असं पाटील म्हणाले.

Tags:    

Similar News