मुंबई बँकेत दरेकरंप्रमाणेच आणखी 3 'श्रीमंत' मजूर?

Update: 2022-03-23 13:14 GMT

भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपण मजूर असल्याचे दाखवून मुंबै बँकेचे संचालकपद मिळवले, असा आरोप झाला आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी दरेकर कोर्टात गेले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. याप्रकरणात दरेकर यांच्याविरोधात आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पण आता धनंजय शिंदे यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. बँक कामगारांचे राष्ट्रीय नेते विश्वास उटगी आणि धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी आल्यावर प्रवीण दरकेर आणि त्यांच्या संचालक मंडळाने अनेक घोटाळे केले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनीसुद्धा बँकेत घोटाळे केले आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला आहे. दरेकर मजूर म्हणून २० वर्षे बँकेवर निवडून आले, पण आमदारकीची निवडणूक लढवताना आपण व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे, प्रतिज्ञा पत्रावर खोटे बोलणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान केवळ दरेकर नाही तर मुंबई बँकेत दरेकरंप्रमाणेच आणखी तीन संचालक 'श्रीमंत' मजूर आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. प्रसाद लाड हे स्वतःच कंपनीचे संचालक असताना कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत कामगार असल्याचे दाखवून मुंबई बँकेत संचालक आहेत, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे. तर आनंदराव गोळे, विनोद बोरसे आणि विठ्ठल भोसले असे तीन संचालक हेसुद्धा श्रीमंत मजूर आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

"यासंदर्भात आम्ही सहकार सुधार समितीच्या लोकांनी सहकार निबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. पण सहकार विभागच भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याने त्यांनी चौकशीची दखल घेतली नाही. आणि या लोकांना पात्र उमेदवार घोषित केले. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे" अशी मागणी विश्वास उटगी आणि धनंजय शिंदे यांनी केली. तसेच प्रवीण दरेकरांनी आपल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच यामागील खरा सूत्रधार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असून त्यांनी सुद्धा या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे.

Tags:    

Similar News