पोलीओ डोसऐवजी सॅनिटायजर पाजले, दोघांवर बडतर्फीची कारवाई
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या पल्स पोलीओ मोहीमेत सॅनिटायझर पाजल्या प्रकरणी आता कडक कारवाईला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे पंढरपुरातील आणखी एका घटनेने पल्स पोलीओ मोहीमेला धक्का बसला आहे.;
यवतमाळ - यवतमाळमध्ये 12 बालकांना पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी आता चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
भंडाऱ्यातील हॉस्पिटलमधील आगीची घटना ताजी असताना असाच हलगर्जीपणाचा प्रकार पल्स पोलीओ मोहिमे दरम्यान राज्यात दोन ठिकाणी घडला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
नेमके काय घडले?
घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान रविवारी 12 लहान मुलांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटीझर पाजल्याचा प्रकार समोर आला. पोलीस डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायझर दिले गेल्याचा प्रकार लक्षात येताच केंद्रावरील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी काही वेळाने त्या मुलांना परत बोलावून पोलिओचा डोस दिला. पण हा गोंधळ झाल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलेच नव्हते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
मुलांना काय त्रास झाला?
यातील ६ वर्षांची एक मुलगी आ ३ वर्षांचा मुलगा यांचे वडील किसन गेडाम यांनी सांगितले की, डोस दिल्यानंतर तासाभरातच त्यांना उलट्या व्हायला लागल्या. त्यांना खांद्यावर घेऊनच आम्ही हॉस्पिटलला आलो. पण यांनी आमच्या मुलांकडे लक्ष दिले नाही. आमच्या मुलांना मारण्याचा प्रयत्न झाला आहे" असे त्यांनी म्हटले आहे.
मुलांना सुरुवातीला उलट्या झाल्या आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यानंतर पालकांनी सर्व मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मुलांवर उपचार करण्यात आले असून सर्व बालकांची प्रकृती स्थिर आहे. ही सर्व बालके एक ते पाच वयोगटातील आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
सॅनिटायजर दिले गेल्याचे लक्षात कसे आले?
कापसीचे सरपंच युवराज मरापे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कापसी केंद्रात आपण लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी गेलो. पण तिथे डोसऐवजी सॅनिटायजर दिले जात असल्याचे माझ्या लक्षात आले. तातडीने तिथल्या कर्मचाऱ्यांच्या ध्यानात ही बाब आणून दिली. पण तोपर्यंत १२ मुलांना डोस दिले गेले होते. आता या मुलांची प्रकृती स्थिर आहे. पण अशाप्रकारे हलगर्जीपणा केला गेल्याने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.
डोस देताना बाळाच्या पोटात प्लास्टिकचा तुकडा गेला
तर दुसरी धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा सूक्ष्म तुकडा गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पंढरपूर येथील प्राथमिक भाळवणी आरोग्य केंद्रात रविवारी पोलिओ लसीकरणा दरम्यान हा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी भाळवणी येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. लस देताना वैद्यकीय केंद्रातील एक महिला लांबूनच बाळांच्या तोंडात लस टाकत होती. अशीच बुरांडे यांच्या लहान बाळाच्या तोंडात लस टाकत असताना हलगर्जीपणामुळे लसीबरोबरच ड्रॉपरचे टोपणही (प्लास्टिकचा लहान तुकडा) बाळाच्या तोंडात गेले. हा प्रकार येथील वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांच्या समोर घडला. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास सुरू झाला. त्यानंतर बाळाला तिथल्या शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी पाठवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकाराला येथील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करावी, अन्यथा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही सामाजिक संघटनांनी दिला आहे.
या दोन्ही घटनांमुळे आता आरोग्य विभागाला अशा मोहीमा राबवताना एक सुसूत्रता आणावी लागेल हे निश्चित.