नागालँडमध्ये गोळीबार, गोळीबारात 13 जणांचा मृत्यू संतप्त गावकऱ्यांनी जाळली सुरक्षा दलाची वाहनं
गुवाहाटी : नागालँड राज्यात काल संध्याकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये आतापर्यंत 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच मृतांचा आणखी आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये नागरिकांनी वाहने जाळल्याचे दिसत आहे. ही घटना नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात घडली आहे.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रिओ यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. मोन जिल्ह्यातील ओटिंग गावामध्ये नागरिकांच्या हत्येची दुर्दैवी घटना अत्यंत निषेधार्ह असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो. या घटनेची उच्चस्तरीय SIT मार्फत चौकशी करून पीडित नागरिकांना न्याय मिळेल, मी समाजातील सर्व घटकांना शांततेचं आवाहन करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.